
सोलापूर, 25 जून (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कथित गैरकारभाराच्या चौकशीसाठी पुणे येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून आलेल्या समितीला आवश्यक कागदपत्रेच उपलब्ध न झाल्याने चौकशी न करताच परत जावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांनी ८ ऑक्टोबर २०२४ ते ६ मे २०२५ या कालावधीत समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. या काळात त्यांनी बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार केल्याचा आरोप दिव्यांग शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक मुठाळ यांनी केला होता. याबाबत प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चौकशीसाठी तीन सदस्यीय पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.
मात्र, चौकशीसाठी आवश्यक असलेली संबंधित कालावधीतील कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने समितीला तपासणी न करताच परतावे लागले. त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी कुठे गेली, ती गायब कशी झाली आणि यामागे कोण जबाबदार आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे गायब झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रभारी दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी सुलभा वठारे आणि प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, दोघांनीही हा विषय आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत जबाबदारी टाळल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार का, तसेच गायब कागदपत्रांचा शोध घेऊन दोषींवर कारवाई केली जाणार का, याकडे आता जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड