
रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । आणीबाणीविरोधातील आंदोलन म्हणजे देशासाठी केलेला त्याग असल्याच्या भावना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केल्या.
संविधान हत्या दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशहितासाठी नव्हे, तर स्वतःच्या बचावासाठी कायद्याचा आणि घटनेचा दुरुपयोग करून आणीबाणी लादली होती. तिला विरोध करताना लाखो कार्यकर्त्यांना कोणताही गुन्हा नसताना शिक्षा भोगावी लागली होती. त्या कार्यकर्त्यांनी देशासाठी केलेले आंदोलन म्हणजे एक त्याग होता. अशी त्यागी माणसे देशाच्या प्रत्येक संकटात धावून आली, म्हणून देश सावरला गेला. अशा त्यागी व्यक्तींचा सन्मान माझ्या हस्ते होणे हे मी माझे भाग्य समजतो. हा कृतज्ञतेच्या भावनेतून केलेला सन्मान आहे.
विवेक भावे, डॉ. संजय केतकर, दत्तात्रय रानडे, दामोदर गाडगीळ, गोपाळकृष्ण रायकर, प्रकाश आमकर, अनिरुद्ध ठाकूर, तुकाराम तोसकर, शिवराम ठीक अशा आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या सत्याग्रहींचा या वेळी खासदार राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आणीबाणीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. त्यांचे स्मरण करून लोकशाही अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. याकरिता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले, असे भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, सहसंयोजक अभय चितळे, राजू भाटलेकर उपस्थित होते.
आणीबाणीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील तीन लाखांहून अधिक देशप्रेमींना, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या १८० जणांचा समावेश असून, त्यापैकी काही जण आज हयात नाहीत, अशी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. इंदिरा गांधींनी आणीबाणी कशी लागू केली व तिचा भारतीयांना कसा त्रास झाला यावर आधारित ध्वनिचित्रफीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखवण्यात आली. आणीबाणीविषयक माहिती देणारे प्रदर्शनही या ठिकाणी मांडण्यात आले होते.
१९७१मध्ये केलेला मिसा कायदा, त्यानंतर न्यायालयात लागलेला निकाल व नंतर लादलेली आणीबाणी यावर डॉ. संजय केतकर यांनी विस्तृत माहिती दिली. विवेक भावे म्हणाले, की आणीबाणीत तुरुंगवास भोगला. आज त्याला ५१ वर्षे होत आहेत. आणीबाणी लादल्याने त्याविरोधात निषेध करण्यासाठी पाऊल उचलले. रा. स्व. संघावर बंदी आली, त्यावेळी सावंतवाडी, कुडाळपर्यंत २० हजार पत्रके जिल्ह्यात पोहोचवली जात होती. तुरुंगात झाडपाल्याची आमटी दिली जायची. त्यामुळे सर्वांना उष्णतेचा त्रास झाला. त्यामुळे शहरातून ताकाचे कॅन तुरुंगात आणून दिले जात होते. ढेकणांचा त्रासही सहन केला. न्यायालयात हजर केले असता कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते अॅड. नानासाहेब पंडित आमच्या बाजूने उभे राहिले. भारतमाता की जय अशा घोषणा देणे देशविरोधी नाही, पाच जणांनी एकत्र येऊ नये, असे न्यायालयाने सांगितले व आमची मुक्तता करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी