सोलापूर जिल्ह्यात 184 नमुना गावे व ब्लॉकची निवड; रोजगार व उद्योग क्षेत्राचा सखोल अभ्यास
सोलापूर, 25 जून (हिं.स.)। सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI), भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) यांच्या सहकार्याने राज्यात प्रथमच जिल्हानिहाय रोजगार व असंघटित उद्योग क्षेत्र
सोलापूर जिल्ह्यात 184 नमुना गावे व ब्लॉकची निवड; रोजगार व उद्योग क्षेत्राचा सखोल अभ्यास


सोलापूर, 25 जून (हिं.स.)।

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI), भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) यांच्या सहकार्याने राज्यात प्रथमच जिल्हानिहाय रोजगार व असंघटित उद्योग क्षेत्राचे व्यापक सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यासाठी नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत राज्यभर राबविले जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात या सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली असून, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने माहितीपत्रकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रगणकांना अचूक व सत्य माहिती देऊन सर्वेक्षणात सहकार्य करण्याचे आवाहन केले.जिल्ह्यात PLFS साठी नागरी व ग्रामीण भागातील 120 तर ASUSE साठी 64 अशा एकूण 184 नमुना गावे व ब्लॉकची निवड करण्यात आली आहे. शास्त्रीय नमुना पद्धतीनुसार निवडलेल्या कुटुंबे व आस्थापनांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करणारी माहिती संकलित केली जाणार आहे.

या प्रसंगी उपआयुक्त संगीता मोरे यांनी सांगितले की, सर्वेक्षणातून मिळणारी माहिती जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब दर्शविणारी असल्याने नागरिकांनी अचूक माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच संकलित करण्यात येणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.या सर्वेक्षणातून रोजगाराची स्थिती, बेरोजगारीचे प्रमाण, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार, लघु व असंघटित बिगर कृषी उद्योगांची स्थिती, कामगारांचे उत्पन्न आदी महत्त्वपूर्ण सांख्यिकीय माहिती संकलित करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय विकास आराखडे तयार करणे, रोजगारविषयक धोरणे निश्चित करणे, उद्योग व गुंतवणुकीला चालना देणे आणि राज्य व देशाच्या विकासाचे वास्तव चित्र समोर आणणे शक्य होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande