
· १३ अधिकारी निलंबित, २२ बाधित कुटुंबांना मदत
मुंबई, 25 जून (हिं.स.)
: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही तसेच त्यांना मकोका लावला जाईल. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून १३ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून दोषींवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे, उमा खापरे, योगेश टिळेकर यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, विषारी दारू प्रकरणात काही आरोपींवर यापूर्वीही उत्पादन शुल्क विभागामार्फत गुन्हे दाखल झाले होते. जामिनावर सुटल्यानंतर त्यांचा पुन्हा अशाच गुन्ह्यांत सहभाग समोर आला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने लक्ष ठेवले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यभरातील अशा व्यक्तींवर विशेष नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात जबाबदारी निश्चित करत निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच इतर अधिकाऱ्यांसह एकूण १३ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मिथेनॉलच्या बेकायदेशीर वापराबाबत राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, संबंधित विक्रेत्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून मिथेनॉलची विक्री केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित आस्थापना सील करण्यात आली आहे. तसेच त्यांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. राज्यात सध्या मिथेनॉल पुरवठ्यासाठी परवानाधारक ९४१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मिथेनॉल पुरवठा, साठवणूक आणि वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
घटनेतील मृत व्यक्तींच्या शवविच्छेदन अहवालांबाबत त्यांनी सांगितले की, सर्व २२ मृतांच्या अहवालांमध्ये विषारी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत सर्व २२ कुटुंबांना देण्यात येणार असून पुढील सात दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीमार्फत सुरू असून संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यात येत आहे. तपासादरम्यान आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून जीपीएस ट्रॅकिंगसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिथेनॉलच्या वाहतूक व विक्री व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी