बीड - स्त्री रुग्णालयात साकारतोय अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता कक्ष
बीड, 26 जून (हिं.स.)। रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, रोटरी क्लब नोवी यू.एस.ए, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन व पालव यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री रुग्णालय, लोखंडी सावरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (NICU) चा लोकार्पण सोहळ
बीड - स्त्री रुग्णालयात साकारतोय अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता कक्ष


बीड, 26 जून (हिं.स.)। रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, रोटरी क्लब नोवी यू.एस.ए, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन व पालव यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री रुग्णालय, लोखंडी सावरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (NICU) चा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. २७ जून रोजी दुपारी ३.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

रोटरी ग्लोबल ग्रॅन्ट अंतर्गत हा प्रकल्प साकारला असून, ग्रामीण भागातील नवजात अर्भकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून जीवनदान मिळणार आहे. कमी वजन, श्वसनाचा त्रास, कावीळ यांसारख्या आजारांनी ग्रस्त नवजात अर्भकांवर तत्काळ उपचार करणे या अत्याधुनिक कक्षामुळे शक्य होणार आहे. व्हेंटिलेटर, बेबी वॉर्मर, फोटोथेरपी युनिट यांसारख्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. यामुळे अंबाजोगाई, केज, धारूर परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, रोटरी क्लब नोवी, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन, सांगली आणि पालव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हा प्रकल्प उभारला जात आहे. या अत्याधुनिक कक्षासाठी रोटरीने ५० लक्ष रुपयांपेक्षा जास्त किमतीची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे व स्वाती हेरकळ, आ. नमिता मुंदडा, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे,उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके, टी.बी. लुल्ला फाउंडेशनचे किशोर लुल्ला यांच्यासह जिल्ह्यातील रोटरी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी परिवार व स्त्री रुग्णालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande