
अकोला, 27 जून (हिं.स.)।राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज, रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी अकोला जिल्ह्यात व्यापक पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर आणि उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. सुशील कुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पोलिओ लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी नागरिकांना मोहिमेबाबत माहिती देत आहेत.
या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1,15,438 बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये ग्रामीण भागातील 87,174 आणि शहरी भागातील 28,244 बालकांचा समावेश आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात 581 तीन सदस्यीय बूथ पथके, 602 दोन सदस्यीय बूथ पथके, तसेच 72 ट्रान्झिट, 83 मोबाईल आणि 63 विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. मोहिमेसाठी आवश्यक लसी व साहित्याचा पुरेसा साठा सर्व ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले की, सध्या देशात पोलिओचे रुग्ण आढळत नसले तरी इतर भागांतून संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे बालकाला यापूर्वी कितीही वेळा पोलिओची लस दिली असली तरी राष्ट्रीय पोलिओ मोहिमेदरम्यान प्रत्येक वेळी पोलिओचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे.पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी आज शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस अवश्य पाजा. तसेच आपल्या मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनाही आपल्या बालकांना पोलिओची लस देण्याबाबत जागरूक करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे