नदीत स्नान करताना ४० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
अकोला, 27 जून (हिं.स.) : अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मि
Photo


अकोला, 27 जून (हिं.स.) : अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरालगतच्या सिरसो गायरान परिसरात राहणारे ज्ञानेश्वर दादाराव सोळंके हे आपल्या कुटुंबासह दोनद येथील आसरा माता मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि दर्शनासाठी गेले होते. देवदर्शनापूर्वी ते काटेपूर्णा नदीत स्नान करण्यासाठी उतरले. मात्र पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले आणि बुडाले.

उपस्थितांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापनद्वारे संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.

या घटनेनंतर सोळंके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिंजर पोलीस पुढील तपास करत आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande