
बीड, 26 जून (हिं.स.) : अंबाजोगाई शहराच्या नागरी आणि दळणवळण विकासाला मोठी गती देणारा ऐतिहासिक निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असून, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (ADB) विशेष निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी तब्बल २७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पांतर्गत रामा-४८६ ते बोधेगाव, राक्षसवाडी, चिंचखंडी, भावठाणा, डोंगरपिंपळा, चनई ते रामा-४८७ या एकूण २७.३०० किलोमीटर लांबीच्या प्रमुख मार्गांचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहरातील सर्व प्रमुख प्रवेशमार्ग आधुनिक चारपदरी स्वरूपात विकसित होणार आहेत.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५.३०० किलोमीटर लांबीचा रस्ता हायवेच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. माता रमाबाई आंबेडकर चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज रोडमार्गे मोरेवाडीपर्यंतचा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता मोठ्या पुलासह चारपदरी करण्यात येणार असून, या मार्गामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच चनई किरमानी दर्गा ते मोरेवाडी चौक आणि इंजिनिअरिंग कॉलेज ते माता रमाबाई चौक या मार्गांचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वैद्य चौक (मेडिकल कॉलेज) ते किरमानी दर्गा, चनई, दगडवाडी मार्ग तसेच किरमानी दर्गा ते केज रोड असा सुमारे ४.३०० किलोमीटर लांबीचा नवीन चारपदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. हा मार्ग चनई येथून आडस रोडकडे जाणाऱ्या चारपदरी रस्त्याशी जोडला जाणार आहे.
या विकासकामामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांचे प्रमाण घटण्यास तसेच मेडिकल कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक आणि नागरी भागांतील संपर्क अधिक जलद व सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंबाजोगाईच्या नागरी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पासाठी निधीसह प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis