गुंड प्रवृत्तीच्या इसमास सहा महिन्यांसाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार
लातूर, 26 जून (हिं.स.)। जिल्ह्यातील देवणी तालुक्यात दहशत निर्माण करून वारंवार कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली असून उपविभागीय दंडाधिकारी, निलंगा यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अन
पोलीस कारवाई


लातूर, 26 जून (हिं.स.)।

जिल्ह्यातील देवणी तालुक्यात दहशत निर्माण करून वारंवार कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली असून उपविभागीय दंडाधिकारी, निलंगा यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अन्वये त्यास सहा महिन्यांसाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. हद्दपार करण्यात आलेल्या इसमाचे नाव शिवहार बाबू सावंत (वय ३० वर्षे), रा. माटेगडी, ता. देवणी, जि. लातूर असे आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशन, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, देवणी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा यांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये सदर इसमाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये मारहाण, दुखापत करणे, शिवीगाळ, धमकी देणे, घरात घुसून हल्ला करणे, महिलांचा विनयभंग करणे तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या विविध गुन्ह्यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान संकलित करण्यात आलेल्या गोपनीय जबाबांमधून सदर इसम हा दारूच्या नशेत नागरिकांना धमकावणे, किरकोळ कारणांवरून मारामाऱ्या करणे, गावात दहशतीचे वातावरण निर्माण करणे तसेच तक्रारदार व साक्षीदारांना धमक्या देण्याची प्रवृत्ती बाळगत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अनेक नागरिक त्याच्याविरोधात तक्रार देण्यासही घाबरत असल्याचे चौकशीत समोर आले.

पोलीस प्रशासनाने यापूर्वी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र त्याच्या वर्तनामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नसून त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती अधिक वाढत असल्याचे आढळून आले. आगामी काळातील विविध सार्वजनिक उत्सव, जयंती, धार्मिक कार्यक्रम तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील परिस्थितीचा विचार करून सदर इसमाचा परिसरातील शांतता व सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निष्पन्न झाले.

उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निलंगा श्री. शरद झाडके यांनी उपलब्ध पुरावे, पोलीस अहवाल, गोपनीय जबाब तसेच प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करून सदर इसमास सहा महिन्यांसाठी लातूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

हद्दपार कालावधीत संबंधित इसमाने तो वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या जवळील पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावणे बंधनकारक राहणार असून आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande