
कोल्हापूर, 26 जून (हिं.स.)। राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता’ योजनेची तरतूद करण्यात आली असून अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे.
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांच्या २५ जून २०२६ रोजीच्या प्रगती अहवालानुसार, उर्वरित २४१ खात्यांपैकी एक हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेली खाती, आधार नसलेले लाभार्थी, मयत सभासद खातेदार तसेच दुबार पीक कर्जाची प्रकरणे यांचा समावेश असून अशा प्रकरणांची पडताळणी आणि आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. लाभासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असून, ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांनाही लाभ मिळेल, अशी व्यवस्था प्रशासनकडून करण्यात आली आहे.
राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यासाठी शासनाने ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून नव्या पीक हंगामासाठी आर्थिक सक्षम बनविण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar