
बीड, 26 जून (हिं.स.)। बीड येथील वर्ग दोनच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट झाल्याने अंतर्गत सुरक्षेचा आणि व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या १६२ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात तब्बल ३६५ कैदी कोंडले गेल्याचे वास्तव समोर आले असून, या अतिगर्दीमुळे कारागृह प्रशासन पूर्णपणे हतबल झाले आहे.
या कारागृहातील एकूण आठ बॅरेकपैकी एक महिलांसाठी राखीव असून, उर्वरित ठिकाणी पुरुष कैद्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. या वाढत्या गर्दीमुळे कैद्यांमध्ये आपापसात वाद आणि हाणामारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, कडक बंदोबस्त असतानाही कारागृहात मोबाईल फोन आणि गांजासारखे अमली पदार्थ पोहोचत असल्याचे उघडकीस आले असून सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कारागृहात अनेक हायप्रोफाइल आणि राजकीय आरोपी देखील बंदिस्त आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून अंबाजोगाई येथे ५०० कैद्यांची क्षमता असलेले 'जिल्हा कारागृह वर्ग-१' मंजूर करण्यात आले असून त्यासाठी जागाही ताब्यात घेण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून सुरक्षा भिंतीसाठी निधी प्राप्त झाला असून इतर कामांसाठी शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. अंबाजोगाईचे हे नवे कारागृह पूर्ण झाल्यानंतर बीड कारागृहावरील ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis