
बीड, 26 जून (हिं.स.) : केज तालुक्यातील कदमवाडी येथील 'गावकरी' हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
माझा मुलगा किंवा मी दोषी आढळलो तर आमच्यावर कठोर कारवाई व्हावी. मात्र राजकीय हेतूने आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात असेल, तर ती सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
हत्या प्रकरणातील एफआयआर आणि पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोनवणे म्हणाले की, सुरुवातीला पोलिसांनी दिलेल्या माहितीत किंवा पहिल्या एफआयआरमध्ये त्यांच्या मुलाचे नाव नव्हते. मात्र नंतर अचानक त्याचे नाव समोर आले. यामागे कोणाचा दबाव किंवा कट होता, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांचा मुलगा घरीच असून तो फरार नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासले असून, स्वतःच्या सीडीआर तपासासाठीही आपण लेखी परवानगी देण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर सोनवणे यांनी अप्रत्यक्ष टीका करत, विरोधी पक्षाच्या खासदारावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेचा राजकीय सूड उगवला जात असल्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
केजमधील विलास घुले हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis