
बीड, 26 जून (हिं.स.) : आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे आणि ग्रामीण भागातील योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात आमदार सुरेश धस यांनी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
बैठकीत मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या हजारो किलोमीटर शेतरस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या कामांची कुशल देयके तसेच राज्य रोजगार हमी योजनेचा निधी प्रलंबित असल्याने तो तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार धस यांनी केली.
याशिवाय जलसिंचन विहीर, शेततळे, गायगोठा आणि शेळीपालन शेड यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रशासकीय मर्यादांमुळे अनेक शेतकऱ्यांची कामे पूर्ण होऊनही देयके रखडली असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या तांत्रिक अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली.
रोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांच्या कामकाजातील अडचणींबाबतही मंत्री गोगावले यांचे लक्ष वेधण्यात आले. ग्रामीण विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होऊन शेतकरी, कामगार आणि ग्रामीण नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis