
लातूर, 26 जून (हिं.स.)। विद्यार्थी आणि पालकांची धावपळ कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असणारे उत्पन्न, जात, अधिवास, राष्ट्रीयत्व यांसह विविध दाखले व प्रमाणपत्रे आता थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ शाळा आणि महाविद्यालयांमध्येच पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार असून, दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित प्रशासनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis