
चंद्रपूर, 26 जून (हिं.स.) : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE व CET प्रवेश परीक्षांचे विशेष मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही योजना 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येणार असून नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या योजनेंतर्गत निवड प्रक्रिया चाळणी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. दुसरी चाळणी परीक्षा 12 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथे आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे.
निवड प्रक्रियेत 40 टक्के विद्यार्थी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधून, 30 टक्के विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधून, तसेच 30 टक्के विद्यार्थी शासकीय, खाजगी व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून निवडले जाणार आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या कार्यालयात सादर करावेत. अर्जाची माहिती कनिष्ठ लिपिक राहुल गोंडाणे यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांक 9049338713 वरही पाठविता येणार आहे.
अर्जासोबत विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, शाळेचे नाव, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता ही माहिती देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या योजनेमुळे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळून वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशाची संधी अधिक सुलभ होणार आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव