चंद्रपूर जिल्ह्यातील 8 आश्रमशाळांमध्ये 30 जूनला शाळा प्रवेशोत्सव
चंद्रपूर, 26 जून (हिं.स.) : आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या अधिपत्याखालील 8 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने न
चंद्रपूर जिल्ह्यातील 8 आश्रमशाळांमध्ये 30 जूनला शाळा प्रवेशोत्सव


चंद्रपूर, 26 जून (हिं.स.) : आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या अधिपत्याखालील 8 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने नव्याने प्रवेश घेतलेल्या तसेच माजी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात येणार असून विविध शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामध्ये विमान प्रवासासह अभ्यास सहल, उन्हाळी शिबीर, बोलका वर्ग, ब्रायटर माइंड, जेईई/नीट पूर्व प्रशिक्षण, मिशन शिखर, मिशन शौर्य, इस्रो भेट, भारत दर्शन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र दर्शन अशा उपक्रमांचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच वसतिगृहांचे गृहपाल यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते 29 जूनपासून संबंधित आश्रमशाळांमध्ये मुक्कामी राहून तयारीचा आढावा घेणार आहेत.

प्रवेशोत्सवाची सुरुवात प्रभातफेरीद्वारे जनजागृतीने होणार असून त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, पेन, पेन्सिल, शालेय साहित्य तसेच नवीन गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे.

तसेच मागील वर्षी बोर्ड परीक्षेत प्रत्येक आश्रमशाळेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

शासकीय आश्रमशाळा, पाटण येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार पालक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प कार्यालय कटिबद्ध असून अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश शासकीय आश्रमशाळांमध्ये घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande