
कराकास, 26 जून (हिं.स.)। वेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने ७.२ आणि ७.५ रिश्टर तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान २३५ जणांचा मृत्यू झाला असून १,५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथके आणि स्थानिक नागरिक युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.
या भीषण भूकंपात सुमारे २५० इमारतींचे नुकसान झाले किंवा त्या पूर्णपणे कोसळल्या आहेत. सुमारे ४,३०० जण जखमी झाले असून जवळपास २०० नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. बेपत्ता व्यक्तींची नोंद करणाऱ्या एका संकेतस्थळावर ४६ हजारांहून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या आकड्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
आपत्तीची तीव्रता लक्षात घेऊन कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांनी ला गुआइरा हा परिसर आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. बचावकार्य अधिक वेगाने करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून जड यंत्रसामग्री मागवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी उद्योग आणि व्यावसायिक संस्थांना बांधकामासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले असून, शक्य तितक्या जास्त नागरिकांचे प्राण वाचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, अनेक रहिवाशांनी अधिकृत बचावकार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक स्वतःच्या हातांनी ढिगारा उपसून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुरुवारी झालेल्या या भूकंपामुळे अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. राजधानी कराकास आणि ला गुआइरा येथील विमानतळ बंद करण्यात आले आहेत. मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली असून शाळांचे तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. अनेक भागांत आफ्टरशॉक्सचेही धक्के जाणवत असल्याची माहिती आहे.
यूएसजीएसच्या (अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण) अंदाजानुसार मृतांचा अंतिम आकडा हजारोंमध्ये जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जगभरातून मदतकार्याला वेग आला असून अनेक देश आणि मानवतावादी संस्थांनी बचाव पथके, आर्थिक मदत आणि अत्यावश्यक साहित्य पाठवण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेने मानवीय मदतीसाठी १५० दशलक्ष डॉलर्सच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे. या निधीत संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि मदत संघटनांसाठी आर्थिक सहाय्य, तसेच आपत्ती प्रतिसाद पथके आणि शहरी शोध व बचाव पथकांच्या तैनातीचा समावेश आहे.याशिवाय, मदतकार्याला सहाय्य करण्यासाठी अमेरिकन लष्कराने दोन युद्धनौका, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर पाठवण्याची घोषणा केली आहे.
मेक्सिको, कोलंबिया, स्पेन, फ्रान्स, इटली, इक्वाडोर, पनामा आणि अल साल्वाडोर यांसह अनेक देशांनी बचाव पथके, वैद्यकीय कर्मचारी, शोधी श्वान, विमाने आणि आपत्कालीन उपकरणे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भीषण आपत्तीबद्दल शोक व्यक्त करत वेनेझुएलाला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode