अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू; व्यापारी संकुल कधी सुरू होणार?
रायगड, 26 जून (हिं.स.)।नेरळ ग्रामपंचायतीने सार्वजनिक रस्ते, गटारे आणि पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोठी मोहीम हाती घेत अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. नेरळ खाडा जकात नाका ते सह्याद्री सेंटर पेट्रोल पंप या मुख्य मार्गासह परिसरातील अतिक्र
Encroachment removal drive underway; when will the commercial complex open?


Encroachment removal drive underway; when will the commercial complex open?


रायगड, 26 जून (हिं.स.)।नेरळ ग्रामपंचायतीने सार्वजनिक रस्ते, गटारे आणि पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोठी मोहीम हाती घेत अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. नेरळ खाडा जकात नाका ते सह्याद्री सेंटर पेट्रोल पंप या मुख्य मार्गासह परिसरातील अतिक्रमणधारकांना दोन दिवसांच्या आत स्वखर्चाने अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले असून, अन्यथा ग्रामपंचायतीकडून थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्य रस्त्यालगत अनेक व्यावसायिकांनी दुकाने रस्त्यावर वाढवून टाकणे, बांधकाम साहित्य, स्टील, सिमेंट, वाळू, फर्निचर, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या तसेच इतर साहित्य सार्वजनिक जागेत ठेवल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय गटारांवर झालेले अतिक्रमण पावसाळ्यात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरत असल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत होत्या.

ग्रामपंचायतीने यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यातही अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. ग्रामसभेत ठरावही मंजूर करण्यात आला होता. मात्र, अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता प्रशासनाने कठोर भूमिका घेत थेट कारवाईची तयारी सुरू केली आहे. नोटीस मिळाल्यानंतरही अतिक्रमण न हटविणाऱ्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने कारवाई करण्यात येणार असून, त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.

मात्र, या कारवाईदरम्यान नेरळमधील व्यापारी संकुलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अतिक्रमणग्रस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लाखो रुपये खर्चून व्यापारी संकुल उभारण्यात आले असतानाही ते अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविणाऱ्या प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एकीकडे अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांसाठी उभारलेले व्यापारी संकुल अद्याप सुरू का झाले नाही? असा सवाल आता नेरळकर नागरिक उपस्थित करत आहेत. अतिक्रमण हटविण्याइतकीच तत्परता व्यापारी संकुल सुरू करण्यासाठीही प्रशासन दाखविणार का, याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande