
रायगड, 26 जून (हिं.स.)। जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या महसूल विभागात तब्बल २३८ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महसुली कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल या तीन महत्त्वाच्या संवर्गातील रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून, नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
महसूल विभाग हा शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, वारस नोंद, उत्पन्न दाखले, जमीन महसूल वसुली, नैसर्गिक आपत्तीतील पंचनामे, शेतपिकांची पाहणी, जनगणना, निवडणूक कामे तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ही महत्त्वाची कामे महसूल यंत्रणेमार्फत केली जातात. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.
जिल्ह्यात मंडळ अधिकाऱ्यांची ९० मंजूर पदांपैकी १४, तलाठ्यांची ५१० पैकी १०६, तर कोतवालांची ३५१ पैकी ११८ पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे एकूण ९५१ मंजूर पदांपैकी ७१३ पदे भरलेली असून २३८ पदे रिक्त आहेत. परिणामी अनेक ठिकाणी एका तलाठ्याकडे दोन ते तीन सजांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गावांतील महसुली कामे, दाखले, फेरफार मंजुरी आणि पंचनामे वेळेत करणे कठीण होत आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, सरकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचविणे आणि महसूल वसुलीची जबाबदारीही याच यंत्रणेवर असल्याने कामाचा ताण अधिक वाढला आहे. अनेक ठिकाणी कोतवालांनाही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.
महसूल विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण प्रशासनाची कार्यक्षमता कमी होत असून, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी आणि महसूल यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्त २३८ पदे तातडीने भरण्याची मागणी नागरिकांसह महसूल कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)