
मुंबई, 26 जून (हिं.स.)। मालाड येथे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालाडमधील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी जैन समाजाच्या वतीने घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी माफीनामा राज ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला. प्रतिनिधींनी या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्ट केले.
यावेळी राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित करत शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दांत समज दिली. मुंबईतील काही भागांत मराठी भाषेतील फलकांवर पांढरे पट्टे मारण्याच्या घटना समोर येत असून, त्यामुळे मराठी आणि जैन समाजामध्ये विनाकारण तणाव निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. असे प्रकार तातडीने थांबविणे आवश्यक असून मराठी भाषेचा आणि मराठी अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
राज ठाकरे म्हणाले की, काही राजकीय पक्षांकडून जैन समाजाचा वापर केला जात असून मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक कृतींपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. सोसायटीमध्ये धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी गालिचे अंथरावेत आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते तातडीने काढून टाकावेत. धर्माचे कार्य करण्यापासून कोणालाही रोखलेले नाही. जैन मुनी पद्मसागर हे माझ्याही घरी येऊन गेले आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून इतरांना त्रास होईल, असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत होता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, जैन समाजाच्या शिष्टमंडळाने भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची ग्वाही दिली. तसेच सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि सौहार्द कायम राखण्यासाठी जैन समाज सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासनही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना दिले. या भेटीनंतर मालाडमधील वादावर पडदा पडण्याची आणि दोन्ही समाजांतील सलोखा अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule