
बीड, 26 जून, (हिं.स.)। केज तालुक्यातील टाकळी परिसरात झालेल्या दुर्दैवी हत्याकांडात मृत पावलेल्या स्व. विलास घुले यांच्या कुटुंबियांची आमदार धनंजय मुंडे यांनी आज टाकळी येथे जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
आरोपींनी संगनमत करून सामान्य गरीब कुटुंबातील उमेश माने या तरुणावर आधी जीवघेणा हल्ला केला. त्याला वाचवायला गेलेल्या विलासचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुटुंबियांना विलासच्या मृतदेहासहित तीन दिवस तिष्ठत बसवण्यात आले, हे क्लेशदायक आणि संतापजनक आहे.
या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी स्वतंत्र एस आय टी समिती स्थापन करण्यात आली असली तरी त्यावर आणि त्यांच्या तपासावर घुले कुटुंबीय समाधानी नाहीत. पीडित उमेश माने व विलासच्या कुटुंबियांना देखील धमकावले जात असून वेगवेगळ्या केसेस मध्ये गुंतवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे मला कुटुंबियांनी सांगितले.
एकूण तपासात पोलिस यंत्रणेमार्फत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? जाती पातीच्या भिंती ओलांडून निष्पक्ष तपास केला जाईल का? याबाबत शंका असून आवश्यकतेनुसार मी पुन्हा याबाबत सभागृहात बोलेन.
कुणाला मुद्दाम अमुक गुन्ह्यात अडकवा, अशी माझी अजिबात भूमिका नाही. मात्र सर्व साक्षीदार, वस्तुस्थिती, डंप डेटा अशा सगळ्या गोष्टी तपासून योग्य तपास व्हावा, ही अपेक्षा आहे. यामध्ये पोलिस यंत्रणा कमी पडल्या तर घुले आणि माने यांच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल...
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis