
अमरावती, 26 जून (हिं.स.) | गेल्या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांना प्रारंभ होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रखडलेल्या पेरण्यांना गती येणार असून या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा वेग कमालीचा मंदावला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या दोन महिन्यांत एकूण १६५० कोटी रुपयांचे लक्ष्य असताना बँकांनी केवळ ८६१.३९ कोटी रुपये कर्जाचे वितरण केले आहे. एकूण लक्ष्यांकांच्या तुलनेत केवळ ५२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
यातही धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील सहा प्रमुख खासगी बँकांनी एकाही शेतकऱ्याला पीककर्ज देण्याचे टाळले आहे. यंदाच्या खरीप हंगामात एक एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण एक लाख ८८ हजार ६०० खातेदार शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५९ हजार ३१४ शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व रोष निर्माण झाला आहे. पीककर्ज वितरणात खासगी बँकांपैकी कॅथलिक सीरियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, इंडसइंड बँक आणि ईएसएएफ बँक यांनी पीककर्ज वाटपास नकार देत पूर्णपणे पाठ फिरविली आहे. या सहा खासगी बँकांनी एकाही शेतकऱ्याला पीककर्ज दिलेले नाही, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ५९ टक्के आणि बँक ऑफ महाराष्ट्रने ३९ टक्के कर्ज वाटप करून चांगली कामगिरी बजावली आहे.
दुसरीकडे, सहकारी बँका पीककर्ज वाटपात आघाडीवर आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांनी ७९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्याने रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे. मृगनक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची वाढलेली चिंता आर्द्रा नक्षत्राने कमी करीत दिलासा दिला आहे. मात्र बियाणे व खतांचे वाढलेले दर, हंगामाच्या प्रारंभीच यूरिया व डीएपी खताचा सर्वत्र तुटवडा आणि लिंकिंगचा त्रास जाणवत आहे. शासकीय अनुदानित यूरिया व डीएपी खताची उचल करण्यास कृषिकेंद्र चालकांत नीरुत्साह असून जादा कमिशन देणारे खत विकण्याकडे त्यांचा कल आहे. शेतीचा खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने बँकांना लवकरात लवकर कर्जवाटप प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अद्याप अनेक शेतकरी बँकांचे उंबरे झिजवण्यास विवश आहेत. यासर्व परिस्थितीमुळे शेती कामाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी