
छत्रपती संभाजीनगर, 26 जून (हिं.स.)।
जालना शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी, उद्योजक, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना आमदार तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून शहरातील वीज समस्येचा सखोल आढावा घेतला.
बैठकीस संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते, ता.प्रमुख भगवान अंभोरे ,महावितरणचे अधीक्षक अभियंता दरख, कार्यकारी अभियंता देवकर, उपअभियंता सचिन उकांडे, उपअभियंता जफार, शाखा अभियंता संजय गहाणे, बनकर यांच्यासह महावितरणचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत नागरिकांच्या तीव्र संतापाची जाणीव करून दिली. वीजपुरवठा ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी जालना शहरासाठी स्वतंत्र डी.पी.आर. (Detailed Project Report) तयार करून वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शहरातील जीर्ण वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मरवरील वाढलेला भार, तांत्रिक अडचणी आणि आवश्यक यंत्रणांचे आधुनिकीकरण यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच शासनाच्या विविध योजनांची प्रलंबित कामे पूर्ण न करणाऱ्या एजन्सींना कारणे दाखवा नोटीस बजावून आवश्यक असल्यास त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जनतेच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जालना शहरातील वीज समस्येचा मुद्दा आमदार खोतकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेतही प्रभावीपणे उपस्थित केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis