अमरावती : पेरणीसाठी सोने गहाण ठेवण्याचे प्रमाण वाढले
अमरावती, 26 जून (हिं.स.) | मृगाने केलेल्या सावकाश आगमनामुळे व यंदाच्या खरीपावर असलेले एल निनोच्या सावटात सकारात्मकता बाळगून पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून शेतकरी आता बि-बियाणे व खते खरेदीकडे वळला आहे. त्यासाठी करावयाच्या आर्थिक तजविजीसाठी गृहिणींच
पेरणीची चिंता ; शेतीच्या आशेवर सौभाग्याचे लेण तारण ग्रामीण भागात बळीराजाची पेरणीसाठी धडपड


अमरावती, 26 जून (हिं.स.) | मृगाने केलेल्या सावकाश आगमनामुळे व यंदाच्या खरीपावर असलेले एल निनोच्या सावटात सकारात्मकता बाळगून पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून शेतकरी आता बि-बियाणे व खते खरेदीकडे वळला आहे. त्यासाठी करावयाच्या आर्थिक तजविजीसाठी गृहिणींच्या सौभाग्याचे लेणे पतसंस्थांत कैद होत असल्याचे चित्र ग्रामीण तसेच शहरी भागातील पतपुरवठादार संस्थांतील सोने तारण ठेवण्यासाठी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीवरून दिसून येत आहे.

कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी किचकट अटी व निकषांच्या फेऱ्यात शेतकर्यांत संभ्रमावस्था असल्याने खरिपासाठी पेरणीपूर्व पीककर्ज मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितताच आहे. अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीनंतर सर्वच वस्तूंचे भाव काही प्रमाणात वाढले असले तरी बियाणे व खतांच्या बाबतीत ही वाढ लक्षणीय आहे. मागील वर्षीचा न भेटलेला विमा व वाढलेल्या बियाण्यांच्या किमती पाहता यंदाच्या खरिपात पेरणीसाठी लागणारी आर्थिक तरतूद भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरचे दागिने बँकेत तारण ठेवण्यास सुरवात केली. परिसरातील पतसंस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातच तब्बल ५० लाखांच्या वर सोने तारण कर्जाचे वाटप केले आहे. हे प्रमाण शहरी भागातील बँकांत कोटींच्या वर आहे. आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सोने तारण ठेवून खरिपाच्या पेरणीची तयारी करावी लागत असल्याने प्रशासनासह बँकांचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्ट्यावर आला आहे.

गतवर्षी परतीच्या पावसाने हाहाकार माजवला तरीदेखील शेतीच्या नुकसानाबाबत लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याला पीक विमा नामंजूर करण्यात आला. हाती आलेला शेतमाल गरजेपोटी मिळेल, त्या दरात विकावा लागला. त्यात बँकांच्या पीककर्ज वाटपाबाबत अद्याप योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. ऑनलाइन अर्ज व वेळखाऊ प्रक्रियेमुळे कर्ज कधी उपलब्ध होईल, या आशेवर न राहता अनेक शेतकऱ्यांनी अर्धांगिनीचे सौभाग्याचे लेणे तारण ठेवून पेरणीसाठी कर्ज काढण्यास सुरवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे तारण ठेवण्यासाठी सोने नाही त्यांनी खासगी सावकारांचे उंबरे झिजवायला सुरवात केली आहे. तालुक्यातील कर्ज देणाऱ्या खासगी बँकांत, पतसंस्थांत सोने तारण ठेवण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती न सुधारण्यामागे शासनाचे फसवे शेतकी धोरण कारणीभूत आहे. शेतीपूरक व्यवसायालाही प्रोत्साहन मिळावयास हवे, असे शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande