राजापेठ बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई; सहा ट्रॅव्हल्स जप्त
अमरावती, 26 जून (हिं.स.)। अमरावती शहरातील राजापेठ बसस्थानक परिसरातून सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा खासगी ट्रॅव्हल्स जप्त केल्या. अनेक वर्षांनंतर झालेल्या या कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या च
राजापेठ बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई; सहा ट्रॅव्हल्स जप्त


अमरावती, 26 जून (हिं.स.)। अमरावती शहरातील राजापेठ बसस्थानक परिसरातून सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा खासगी ट्रॅव्हल्स जप्त केल्या. अनेक वर्षांनंतर झालेल्या या कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक व मालकांमध्ये खळबळ उडाली असून वाहने सोडविण्यासाठी संबंधितांची पोलीस ठाण्यात धावपळ सुरू आहे.

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत, विशेषतः राजापेठ बसस्थानकासमोर, खासगी ट्रॅव्हल्सद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सहा बसेस ताब्यात घेतल्या. यामध्ये एमएच-२६-सीएच-२९४६, एमएच-४४-डी-९१९७, एमएच-१२-एफसी-९४०२, एमएच-४९-एटी-५२५३, एमएच-३४-एबी-८१०४८ आणि एमएच-२९-बीई-९८७५ या वाहनांचा समावेश आहे. संबंधित वाहनांवर कायदेशीर कारवाई करून त्या राजापेठ पोलीस ठाण्यात उभ्या करण्यात आल्या आहेत.

राजापेठ बसस्थानकासमोर प्रवासी घेण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर थांबत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. पोलिसांच्या कारवाईनंतर अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मते, राजापेठ बसस्थानकासमोरून यवतमाळ, नेर आणि नांदगाव खंडेश्वरकडे दररोज १७ ते १८ खासगी ट्रॅव्हल्स अवैधरित्या प्रवासी वाहतूक करतात. तसेच बडनेरा बसस्थानक परिसरातूनही अशाच प्रकारची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ पोलिसांनीच नव्हे, तर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेनेही सातत्याने संयुक्त कारवाई करून अवैध प्रवासी वाहतुकीवर कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande