जळगावमार्गे आषाढी निमित्त पंढरपूरसाठी धावणार चार विशेष गाड्या
जळगाव , 26 जून (हिं.स.) | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकऱ्यांचा जनसागर उसळतो. या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. भाविकांची आणि वारकऱ्यांची
जळगावमार्गे आषाढी निमित्त पंढरपूरसाठी धावणार चार विशेष गाड्या


जळगाव , 26 जून (हिं.स.) | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकऱ्यांचा जनसागर उसळतो. या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. भाविकांची आणि वारकऱ्यांची हीच वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेकडून एकूण चार विशेष गाड्या प्रत्येकी चार फेऱ्यांमध्ये चालविण्यात येणार आहेत. त्यामध्ये नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्यात येणार असून, रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भ, जळगाव जिल्ह्यासह खान्देश आणि मराठवाडा भागातील हजारो भाविकांचा विठ्ठल दर्शनाचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे.

विशेष या गाड्यांना भुसावळ, जळगाव, मनमाड, पाचोरा, चाळीसगाव यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असणार आहे. गाडी क्रमांक ०१२०५ ही विशेष गाडी २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१२०६ क्रमांकाची गाडी २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, पंढरपूर आदी प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. गाडीत २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील गाडी क्रमांक ०१११९ ही विशेष गाडी २१ आणि २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता नवी अमरावतीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११२० ही गाडी २२ आणि २५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवी अमरावतीला पोहोचेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा असेल. गाडीत २ एसी, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड ब्रेकव्हॅन असतील.

गाडी क्रमांक ०११२१ ही विशेष गाडी २१ आणि २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगावहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११२२ ही गाडी २२ आणि २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगावला पोहोचेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला असून, गाडीत १६ डबे असतील. कमी खर्चात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष (०११५९/०११६०) गाडीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.२४ आणि २५ जुलै रोजी ही गाडी दुपारी १.३० वाजता भुसावळहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल. या गाडीत सर्व १६ सामान्य (अनारक्षित) डबे असतील. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande