संजय दीना पाटील व राजकीय वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
नागपूर, 26 जून (हिं.स.) : खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नागपुरात माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
उदय सामंत


नागपूर, 26 जून (हिं.स.) : खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नागपुरात माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी संजय दीना पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करताना तसेच विरोधकांवरही निशाणा साधताना राजकीय वातावरणावर भाष्य केले.

उदय सामंत यांनी सांगितले की, संजय दीना पाटील यांची वागण्याची पद्धत आणि देहबोली तशीच आहे. मात्र त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली असून पक्षाने त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे हा विषय आता इथेच थांबवावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच भूतकाळातील राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना सामंत म्हणाले की, वेगवेगळ्या पक्षांमध्ये असताना अनेकदा कठोर शब्दप्रयोग आणि धमक्यांचा सामना करावा लागला होता. संविधानानुसार विचार बदलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यावरून वैयक्तिक टीका किंवा शिवीगाळ योग्य नसल्याचे सामंत म्हणाले. त्यांनी संजय पाटील यांच्या रागामागे जुने राजकीय अनुभव कारणीभूत असू शकतात, असेही सूचित केले.

संजय दीना पाटील यांच्याशी वैयक्तिक संबंधांबाबत बोलताना सामंत म्हणाले की, “गेल्या 25 वर्षांपासून मी त्यांना ओळखतो. ते दिलदार आणि मनाने चांगले व्यक्तिमत्त्व आहेत.” तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्याशी चर्चा करून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, असे समजावल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे कोणी दुखावले असेल तर स्वतः दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुरू असलेल्या राजकीय हालचाली आणि संभाव्य पक्षप्रवेशांबाबत बोलताना सामंत यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील काही नेत्यांना शिंदे गटात येण्याची इच्छा असल्यास त्याचे स्वागत केले जाईल. त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचेही नाव घेत सूचक विधान केले.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्या अयोध्या राम मंदिराशी संबंधित ट्विटवर प्रतिक्रिया देताना सामंत यांनी मिश्किल टिप्पणी करत हा विषय फारसा महत्त्वाचा नसल्याचे सांगितले.या संपूर्ण घडामोडींमुळे नागपूरमध्ये राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून पुढील काही दिवसांत यावर अधिक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande