गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण ही काळाची गरज – धिरज देशमुख
लातूर, 26 जून (हिं.स.)। देशाला मोठ्या त्याग आणि संघर्षातून स्वातंत्र्य मिळाले असून स्वातंत्र्योत्तर काळात जिल्हा परिषद शाळांनी देशाच्या विकासात तसेच लाखो विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. अनेक मान्यवर व्यक्ती जिल्हा परिषद शाळांमधून
धिरज देशमुख


लातूर, 26 जून (हिं.स.)। देशाला मोठ्या त्याग आणि संघर्षातून स्वातंत्र्य मिळाले असून स्वातंत्र्योत्तर काळात जिल्हा परिषद शाळांनी देशाच्या विकासात तसेच लाखो विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. अनेक मान्यवर व्यक्ती जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

एकुर्गा जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमा ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळांसमोरील विविध समस्यांवर भाष्य केले. काही वर्षांपूर्वी वीज बिल न भरल्यामुळे मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेची वीज खंडित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण स्वतः पुढाकार घेऊन शाळेचे वीज बिल भरले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

याचबरोबर विधानसभेत जिल्हा परिषद शाळांच्या वीज बिलाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींनी शाळांचे वीज बिल भरण्याचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि हा निर्णय मार्गी लागल्याचेही धिरज देशमुख त्यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ‘रीड लातूर’ उपक्रमाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य सुरू असून या उपक्रमात दीपशिखा धिरज देशमुख, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध योजनांच्या माध्यमातून शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळा सक्षम व्हाव्यात आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी केले. प्रारंभी एकुर्गा जिल्हा परिषद शाळेत नववीच्या तुकडीची मान्यता मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने धिरज विलासराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande