
रत्नागिरी, 26 जून (हिं.स.) । आधुनिक काळातही शाहू महाराजांच्या विचारांची आणि कार्याची देशाला मोठी गरज आहे, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केले.
एस पी हेगशेट्ये वरिष्ठ आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सामाजिक न्याय व समानता निर्माण करण्यासाठी आणि दुर्बलांचे सशक्तीकरण करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या शाहू महाराजांचे कार्य काळाचे पुढचे आहे. त्यांचे कार्य केवळ पुस्तकात न ठेवता ते आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे, त्यांचे विचार जपणे आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोहचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक क्रांतीबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी इतिहासप्रसिद्ध ‘वेदोक्त प्रकरणावर’ सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले, वेदोक्त प्रकरण हे केवळ धार्मिक वाद नव्हता, तर ती तत्कालीन सामाजिक विषमतेविरुद्ध शाहू महाराजांनी पुकारलेली मोठी क्रांती होती. त्यांनी पुरोगामी विचारांची कास धरून समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा हा लढा आजच्या तरुण पिढीने समजून घेणे गरजेचे आहे.
शाहू महाराजांनी वसतीगृहे बांधून, शिक्षण मोफत आणि सक्तीचे करून काय सामाजिक क्रांती केली आणि त्यांनी सुरू केलेल्या आरक्षणाचे महत्त्व काय होते याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी