तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र शासनाने सुरू केली SMILE शिष्यवृत्ती योजना
सोलापूर, 26 जून (हिं.स.)। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise (SMILE) योजनेअंतर्गत तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण
तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र शासनाने सुरू केली SMILE शिष्यवृत्ती योजना


सोलापूर, 26 जून (हिं.स.)।

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise (SMILE) योजनेअंतर्गत तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे इयत्ता 9 वीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांना वार्षिक आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी शासनमान्य शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच UGC/AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र आहेत. अर्जदाराकडे Transgender Certificate असणे बंधनकारक आहे.

योजनेअंतर्गत पूर्व-माध्यमिक (Pre-Matric) आणि उत्तर-माध्यमिक (Post-Matric) स्तरावरील विद्यार्थ्यांना वार्षिक ₹13,500 इतकी शिष्यवृत्ती दिली जाईल. अर्जदार भारतीय नागरिक असावा, इतर कोणत्याही केंद्र किंवा राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत नसावा तसेच त्याचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि संबंधित यंत्रणांनी या योजनेची व्यापक प्रसिद्धी करून पात्र तृतीयपंथी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करावे, असे निर्देश समाज कल्याण आयुक्तालयाने दिले आहेत.

अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन सोलापूरचे सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande