
मुंबई, 26 जून (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतर्गत राहणाऱ्या कुष्ठपीडितांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात किमान पाच हजार रुपयांपर्यंत तातडीने वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी 'महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटना' यांच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची काल (दिनांक २५ जून २०२६) सायंकाळी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री. गणेश खणकर हे या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते. श्री. खणकर यांच्या माध्यमातून या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेवून निवेदन सादर केले.
या निवेदनाची तत्काळ दखल घेत महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कुष्ठपीडितांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना या संदर्भात सविस्तर पत्र लिहिले आहे. कुष्ठपीडितांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात पाच हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचे निर्देश महापौर श्रीमती तावडे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र तुकाराम चव्हाण यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जून २०१९ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कुष्ठपीडितांना दरमहा अडीच हजार रुपये इतके विशेष अनुदान दिले जात आहे. मात्र, सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात या अत्यंत कमी रक्कमेत कुष्ठपीडितांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि दैनंदिन गरजा भागवणे अशक्य झाले आहे. पनवेल महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील कमी उत्पन्न असणाऱ्या कुष्ठपीडितांना प्रतिमहा चार हजार रुपये इतके विशेष अनुदान देत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील कुष्ठपीडितांना प्रतिमाह किमान पाच हजार रुपयांपर्यंत विशेष अनुदान मंजूर करावे, जेणेकरून या पीडित कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी विनंती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
महापौर श्रीमती रितू तावडे यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की, कुष्ठपीडितांच्या जीवनमानाचा आणि महागाईचा विचार करता ही मागणी न्याय्य आहे. या विषयावर महानगरपालिका आयुक्तांना तत्काळ पत्र पाठविले आहे आणि या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवून कुष्ठपीडितांना प्रतिमाह किमान पाच हजार रुपयांपर्यंत विशेष अनुदान मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे महापौरांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी