
मुंबई, 26 जून (हिं.स.)
: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा क्षण. यानिमित्ताने शनिवार, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओत तयार करण्यात आलेल्या विशेष ‘शिवराज्याभिषेक गीताचे लोकार्पण होणार आहे. तसेच शिवस्वराज्यगाथा या प्रेरक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रेरणेने विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले अतिशय प्रेरक असे शिवराज्याभिषेक गीत ॲड. मृणाल भिडे यांनी लिहिले असून संगीत संयोजन व प्रोग्रामिंग प्रणव हरिदास यांनी केले आहे. वैशाली सामंत,अजित परब,अनिरुद्ध जोशी, रसिका जोशी, अवनी जोशी, निधी रानडे, कार्तिक लेले, प्रणव हरिदास आणि दीपक करंजीकर यांचे स्वर गीताला लाभले असून कृष्णा मुसळे, आर्चिस लेले, प्रफुल शिंदे, सौरभ शिर्के यांनी वादनाचे रंग भरले आहेत. अकादमीच्या स्टुडिओत याचे ध्वनिमुद्रण, मिक्सिंग आणि मास्टरिंग उर्मिला सुतार यांनी तर पोस्ट प्रोडक्शन महेश चौगुले यांच्या नेतृत्वात प्रवीण हंकारे, पियुष चव्हाण, अमृता मयेकर, वेदांत जिंदम, निखिल मिश्रा यांच्या चमूने केले आहे.
अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांची संकल्पना आणि संयोजन असलेल्या या गीताच्या निर्मितीसाठी विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. तसेच यावेळी सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई निर्मित व प्रस्तुत “संगीत शिवस्वराज्यगाथा” हा नवगीतांचा प्रेरणादायी सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवचरित्रातील परिचित अपरिचित योद्ध्यांच्या पराक्रमाच्या गाथा आणि प्रसंग, नवगीते, संगीत, चलचित्र आणि ओजस्वी निवेदनाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली जातात. गायक नचिकेत देसाई, श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी आणि अनिल नलावडे यांच्या स्वरातून, पद्मश्री राव यांच्या ओजस्वी शिवकथनातून शिवकालाचा जाज्वल्य इतिहास रसिकांसमोर राहणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश आहे.
शिवरायांच्या विचारांची प्रेरणा, स्वराज्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची ज्योत अनुभवण्यासाठी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी