टाकळी हत्याकांड प्रकरणी पीडित घुले कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे : प्रीतम मुंडे
बीड, 26 जून (हिं.स.) : तालुक्यातील टाकळी येथे हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या दुर्दैवी हत्येनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांनी टाकळी येथे जाऊन पीडित घुले कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच य
टाकळी हत्याकांड प्रकरणी पीडित घुले कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे : प्रीतम मुंडे


बीड, 26 जून (हिं.स.) : तालुक्यातील टाकळी येथे हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या दुर्दैवी हत्येनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांनी टाकळी येथे जाऊन पीडित घुले कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी या घटनेमुळे बीड जिल्ह्याच्या प्रतिमेला काळिमा फासला गेल्याचे सांगितले. केवळ भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या निष्पाप आणि कोणत्याही राजकीय वा सामाजिक संस्थेशी संबंध नसलेल्या व्यक्तीचा डोळ्यादेखत जीव घेण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, त्यामार्फत पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला दाखवलेल्या दिरंगाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, वेळेत सहकार्य केले असते तर कुटुंबावर तब्बल ४८ तास मृतदेह ताटकळत ठेवण्याची वेळ आली नसती, अशी टीका केली.

या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींची नावे चर्चेत असली तरी तपास यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत, जिल्ह्याची लेक म्हणून या कुटुंबाला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे. लोकशाही मार्गाने न्याय मिळाला नाही, तर आंदोलन करण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

घुले कुटुंब कोणाविरुद्ध सूडबुद्धीने वागत नसून, आमच्या निष्पाप मुलाचा काय दोष होता ? हा त्यांचा मुख्य प्रश्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई व्हावी, तसेच कुटुंबाने केलेल्या नार्को चाचणीच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तपास योग्य दिशेने झाला नाही, तर पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande