अमरावती तहसीलचे शहर व ग्रामीण असे विभाजन
नवीन अपर तहसीलदार कार्यालयासाठी हरकती-सूचना मागविल्या अमरावती, २७ जून (हिं.स.) : अमरावती तहसीलचे अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण असे विभाजन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयानुसार शह
अमरावती तहसीलचे शहर व ग्रामीण असे विभाजन


नवीन अपर तहसीलदार कार्यालयासाठी हरकती-सूचना मागविल्या

अमरावती, २७ जून (हिं.स.) : अमरावती तहसीलचे अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण असे विभाजन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयानुसार शहरासाठी स्वतंत्र तहसीलदार तर ग्रामीण भागासाठी अपर तहसीलदार यांचे स्वतंत्र कार्यालय कार्यरत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने अमरावती येथे प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालयाबाबत १५ दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रस्तावावर नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

प्रस्तावानुसार अमरावती जिल्ह्यात अपर तहसील कार्यालय (अमरावती शहर) आणि अपर तहसील कार्यालय (अमरावती ग्रामीण) अशी दोन स्वतंत्र कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. या नव्या प्रशासकीय रचनेत संबंधित महसूल मंडळे, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी साजे तसेच गावांचे पुनर्विभाजन करण्यात येणार आहे.

दोन्ही प्रस्तावित कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या महसूल मंडळे आणि गावांच्या रचनेबाबत नागरिकांनी आपल्या लेखी हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात, असे आवाहन अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

महसूल विभागाच्या या प्रस्तावामुळे नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक सुलभ, जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande