
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने मंठा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ३० जून २०२६ रोजी पंचायत समिती मंठा येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे.
SR Trust, मध्यप्रदेश आणि ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स तसेच इतर सहाय्यक उपकरणांचे मोजमाप करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुक दिव्यांग नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व वैद्यकीय अपंगत्व प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्व पात्र दिव्यांग बांधवांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिकांना आवश्यक सहाय्यक उपकरणे मिळण्यास मदत होणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता निर्माण होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis