
अमरावती, 27 जून (हिं.स.) : शहरातील प्रदूषण कमी करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अमरावती महानगरपालिकेला ५० इलेक्ट्रिक सिटी बस मंजूर केल्या आहेत. मात्र, चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोचे काम संथ गतीने सुरू असल्याने शहरवासीयांना या बससेवेसाठी आणखी किमान सव्वा ते दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोंडेश्वर मार्गावरील जकात नाका आणि फिशरीज हब परिसरात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन व डेपो उभारण्याचे काम सुरू आहे. परिसरात सुरक्षा भिंत उभारण्यात आली असून बॅकअपसाठी जनरेटरही उपलब्ध झाले आहेत. मात्र, चार्जिंग स्टेशनचे बांधकाम अद्याप प्राथमिक टप्प्यातच असून प्रत्यक्ष सुविधा कार्यान्वित झालेल्या नाहीत.
शासनाकडून सुमारे ५.८८ एकर जागा उपलब्ध होऊन वर्षभर उलटले असले तरी प्रकल्पाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. या डेपोमध्ये एकावेळी आठ बस चार्ज करता येणार असून प्रत्येक बस चार्ज होण्यासाठी सुमारे चार तास लागतील. प्रत्येक चार्जिंग स्टेशनची क्षमता २४० किलोवॅट असून एकूण ९४० किलोवॅट क्षमतेचे सब-स्टेशन उभारण्यात येत आहे.
महापालिकेला मिळणाऱ्या ५० ई-बसमध्ये ४० बस या ९ मीटर लांबीच्या असून प्रत्येक बसमध्ये ३८ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असेल. दरम्यान, सध्या शहरात धावणाऱ्या इंधनावरील सिटी बसची अवस्था जीर्ण झाली असून त्या सतत दुरुस्ती करून रस्त्यावर चालवाव्या लागत आहेत. त्यामुळे ई-सिटी बससेवा सुरू करणे अत्यावश्यक असतानाही प्रकल्पाच्या कामातील संथ गतीमुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी