
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाईचा इशारा
रायगड, 27 जून (हिं.स.) : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य परिवहन विभाग लवकरच घेणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. तसेच मालवाहू वाहनांतून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करून संबंधित वाहनांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.
ग्रामीण भागात लग्न किंवा अन्य शुभकार्यांसाठी प्रवासी वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होत असल्याने अनेक कुटुंबे ट्रक, डंपर आणि पिकअपसारख्या मालवाहू वाहनांचा वापर करतात. अशा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळामार्फत विशेष योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होणार असून, त्यापैकी काही बसेस ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातील. संबंधित कुटुंबाने आगाऊ मागणी केल्यास शक्य तितक्या प्रमाणात बस त्यांच्या गावापर्यंत किंवा घराजवळ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, प्रवाशांनी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गांवर दर्जेदार आणि सुस्थितीतील बसेस चालवाव्यात, तसेच जुन्या बसेसच्या बिघाडामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)