
नांदेड, 27 जून (हिं.स.)।
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सलग तीन दिवस शासकीय सुटी आल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली आहे. शुक्रवारी मोहरमनिमित्त, त्यानंतर शनिवार व रविवार अशी सलग सुट्या असल्याने आता अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (ता. २९) आणि मंगळवार (ता. ३०) हेच दोन दिवस उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज विक्रीच्या चौथ्या दिवसाअखेर जिल्हाभरातून २९६ नामनिर्देशन अर्जाची विक्री झाली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ दोन उमेदवारांनीच प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुतांश इच्छुकांनी अर्ज खरेदी करून अंतिम दिवसांत नामनिर्देशन दाखल करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने विविध राजकीय पक्ष, सहकारी संस्था आणि स्थानिक नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवार निश्चिती, पॅनेल उभारणी आणि जागावाटपाबाबत बैठका सुरू असून, त्यानंतरच अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला जात आहे. सलग सुट्यांमुळे निवडणूक कार्यालय बंद राहणार असल्याने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तीन दिवस ठप्प राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis