
रायगड, 27 जून (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील अनेक बिअर शॉपींमध्ये ग्राहकांकडून छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. बिअरच्या प्रत्येक बाटलीमागे 10 ते 20 रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत असून, या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, बिअर शॉपीमध्ये एमआरपीपेक्षा जादा पैसे का घेतले जात आहेत, अशी विचारणा केल्यास दुकानदारांकडून “कुलिंग चार्ज” असल्याचे सांगितले जाते. मात्र, बिअर उत्पादक कंपन्यांकडून शीतकरणासाठी आवश्यक मार्जिन आधीच वितरक आणि विक्रेत्यांना दिले जात असल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे अतिरिक्त वसुली कोणत्या नियमाच्या आधारे केली जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.
एका बिअरप्रेमीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, काही ठिकाणी विशेषतः लोकप्रिय ब्रँडच्या बिअरवर प्रति बाटली तब्बल 10 ते 20 रुपये अतिरिक्त आकारले जात आहेत. अशा प्रकारे दररोज मोठ्या संख्येने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात जादा रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जिल्ह्यातील बिअर शॉपींची तपासणी करावी. एमआरपीपेक्षा अधिक दर आकारले जात असल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)