
रायगड, 27 जून (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाने 26 जून हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही रायगड जिल्हा परिषदेत या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी स्वतः परिपत्रक काढूनही त्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विषय समित्यांचे सभापती, प्रकल्प संचालक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहावेत, असे स्पष्ट निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच बहुतांश वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. परिणामी काही कर्मचाऱ्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण केली.
राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ शासनाने हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही होत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या तयारीसाठी ते आदल्या रात्रीपासून तेथे उपस्थित होते. त्यामुळे शाहू महाराज जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्याची उपस्थिती नसणे अत्यंत खेदजनक असून शासन परिपत्रकानुसार अपेक्षित उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)