
अमरावती, 27 जून (हिं.स.) | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवार, २८ जून रोजी अमरावती शहरातील ३८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदा पेपर-१ साठी ७,३९१ तर पेपर-२ साठी १०,७२८ असे एकूण १८,११९ परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षेचे आयोजन जिल्हा नियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तसेच उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली असून केंद्रसंचालक, साहाय्यक पर्यवेक्षक, झोनल अधिकारी आणि परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची स्वतंत्र बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. शहरातील ३८ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून या सर्वे परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत संपूर्ण परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाकडून परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात येणार असून शिक्षणाधिकारी (प्राथमिक), (माध्यमिक) व (योजना) कार्यालयाची भरारी पथकेही केंद्रांची पाहणी करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी