वन स्टॉप सेंटरच्या तत्परतेमुळे विवाहितेची सुटका
रायगड–उत्तर प्रदेश समन्वयातून यशस्वी बचावमोहीम
One-Stop Centre proves to be a ray of hope; married woman freed from abuse.


रायगड, 27 जून (हिं.स.) : सासरी होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळलेल्या एका विवाहितेला रायगड जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरच्या तत्परतेमुळे नवजीवन मिळाले आहे. बहिणीच्या एका मदतीच्या फोननंतर रायगड आणि उत्तर प्रदेशातील संबंधित यंत्रणांनी तातडीने समन्वय साधत पीडितेची अत्याचाराच्या विळख्यातून सुखरूप सुटका करून तिला माहेरी पोहोचवले.

प्रेमविवाहानंतर आनंदी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या विवाहितेचे वैवाहिक जीवन काही दिवसांतच संघर्षमय ठरले. सासरी सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने ती गंभीर नैराश्यात गेली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तिच्या बहिणीने रायगड जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

तक्रार प्राप्त होताच वन स्टॉप सेंटरच्या पथकाने तातडीने हालचाल सुरू केली. रायगडमधून उत्तर प्रदेशातील संबंधित वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधत दोन्ही राज्यांतील यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात आला. त्यानंतर संबंधित महिलेपर्यंत पोहोचून तिचे प्राथमिक समुपदेशन करण्यात आले. मात्र छळ सुरूच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

अखेर संयुक्त प्रयत्नांतून त्या महिलेची सुरक्षित सुटका करून तिला रायगडमधील माहेरी आणण्यात आले. या घटनेमुळे संकटाच्या काळात योग्य वेळी मदत घेतल्यास शासकीय यंत्रणा प्रभावीपणे हस्तक्षेप करू शकते, हे अधोरेखित झाले आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोहिनी वाघमारे, स्वाती म्हात्रे आणि सारिका पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. पीडितेच्या कुटुंबीयांनी वन स्टॉप सेंटरचे आभार मानताना भावनिक प्रतिक्रिया दिली. “आमच्या मुलीला पुन्हा पाहू शकू अशी आशाच उरली नव्हती, मात्र वन स्टॉप सेंटरने देवदूताप्रमाणे मदत करून तिला सुरक्षित घरी आणले,” असे त्यांनी सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande