वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। वडिगोद्री–पाचोड राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात जांभळांनी भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांची जांभळे रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रस्त्यावर पडलेली जांभळे
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)।

वडिगोद्री–पाचोड राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात जांभळांनी भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांची जांभळे रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रस्त्यावर पडलेली जांभळे गोळा करण्यासाठी अक्षरशः झडप घातल्याने काही काळ अनोखे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे जांभळांची वाहतूक करणारे पिकअप (क्र. एमएच 16 सीडी 2464) मुरमा शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पलटी झाले. वाहनात सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे भरलेली होती.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर विखुरलेली जांभळे गोळा करण्यासाठी अनेकांनी पिशव्या, पोती व इतर साधनांचा वापर केला. काही वेळातच मोठी गर्दी झाल्याने परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला.

या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले असून जांभळांचा मोठ्या प्रमाणात मालही वाया गेला. अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या मालाची नागरिकांनी केलेली लूट परिसरात चर्चेचा विषय ठरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande