
लातूर, 27 जून (हिं.स.)।
सारथीच्या कार्यक्रमात बसण्याच्या व्यवस्थेवरून मोठा वाद उफाळल्याचा दावा करण्यात आला असून, खासदार सौ. मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा रंगली आहे.
मेधा कुलकर्णी यांनी आरोप केला की, त्यांना पुढे बसू नका, हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, विनाकारण वाद होईल, असे सांगण्यात आले. या घटनेनंतर
आमदार साहेब, पीएच्या भूमिकेतून बाहेर या... सगळे मीच करतो, समाजासाठी मीच करतो, बाकीचे समाज दिसत नाहीत का? अशा शब्दांत सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.
ब्राह्मण समाजातील काही नागरिकांकडून असा आरोप केला जात आहे की निवडणुकीच्या काळात समाजाची आठवण काढली जाते; मात्र निवडणूक संपल्यानंतर समाजातील मान्यवरांना योग्य तो सन्मान दिला जात नाही. औशा येथील निवडणुकीदरम्यान समाजाने केलेले सहकार्य विसरले गेले का? असा प्रश्नही मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला होता.
त्या वेळी मेधा कुलकर्णी यांनी बोलण्याची संधी नाकारली असती तर कसे वाटले असते? मग आज समाजातील मान्यवरांचा अपमान का? असा सवालही सोशल मीडियावर केला जात आहे.
याशिवाय, निधीच्या वापराबाबत आणि विविध निर्णयांबाबतही सोशल मीडियावर तीव्र टीका होत असल्याचे दिसून येत आहे. काही पोस्टमध्ये देवाभाऊंचे नाव वापरले जाते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि समाजातील लोकांचा सन्मान कोण करणार? असा संतप्त सूर उमटत आहे.
देवाभाऊंच्या नावावर राजकारण, कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा खेळ? ब्राह्मण समाजातून संतप्त आरोपप्रतिक्रिया उमटत आहेत
ब्राह्मण समाजाला देवेंद्र फडणवीसांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा; कंपन्या, संचालकपदे आणि आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न. निर्माण झाले आहेत
ब्राह्मण समाजातील काही घटकांकडून सध्या गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वापर करून विविध कंपन्या स्थापन केल्या आणि जवळच्या लोकांना संचालकपदी नियुक्त करून आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, हे कथित व्यवहार उघड होऊ नयेत म्हणून ब्राह्मण समाजातील लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचाही दावा केला जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जर या नाराजीकडे वेळेत लक्ष दिले गेले नाही, तर स्थानिक पातळीवरील असंतोष भविष्यातील निवडणुकांतील राजकीय गणितांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे हा वाद नेमका कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis