
कोल्हापूर, २७ जून (हिं.स.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक स्व. डॉ. जयसिंगराव पवार यांना राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त मरणोत्तर ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार-२०२६' प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला.
राजर्षी शाहू स्मारक येथे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात डॉ. पवार यांच्या इतिहास संशोधनातील उल्लेखनीय कार्याचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या दैदिप्यमान योगदानाचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. पवार यांचे इतिहास संशोधनातील कार्य अत्यंत मोलाचे असल्याचे सांगत, त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन केले. ४० व्या राजर्षी शाहू पुरस्काराने त्यांचा सन्मान होणे ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी डॉ. पवार यांच्या संशोधनाला देश-विदेशात मान्यता मिळाल्याचे सांगत, त्यांच्या संशोधनाचा अधिकृत संदर्भ म्हणून वापर केला जात असल्याचे नमूद केले. वस्तुनिष्ठ इतिहास मांडणारे ते अभ्यासू संशोधक होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी समाजप्रबोधनाच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या 'शाहू स्मरणिका'चेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन व निर्मितीचे कार्य डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले होते. त्यांच्या निधनापूर्वी हे काम अंतिम टप्प्यात पूर्ण झाले होते. विविध नामवंत विचारवंतांचे राजर्षी शाहू महाराजांवरील लेख या स्मरणिकेत समाविष्ट करण्यात आले असून ती ट्रस्ट कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. पवार यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार यांनी मनोगत व्यक्त करत ट्रस्टचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस बँडतर्फे मानवंदना देण्यात आली तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नूतनीकरणानंतर शाहू स्मारक भवन येथे झालेला हा पहिलाच ऐतिहासिक सोहळा ठरला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar