बच्चू कडूंच्या विधानावर रवी राणांचा पलटवार; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील
अमरावती, २७ जून (हिं.स.) : आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर
रवी राणांचा बच्चू कडूंवर थेट निशाणा; फडणवीसच राहणार मुख्यमंत्री, विकासाच्या मुद्द्यावर दिले आव्हान


अमरावती, २७ जून (हिं.स.) : आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर थेट निशाणा साधत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

रवी राणा म्हणाले की, राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या विकासासाठी आणि हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे. राज्याच्या विकासासाठी स्थिर नेतृत्वाची गरज असून देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्या तोडीचे असल्याचे सांगत रवी राणा यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच रवी राणांचे रसायन वेगळे आहे, असे म्हणणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर देत, जनतेच्या हिताचे रसायन वापरून दाखवा, मगच लोकांना न्याय मिळेल, असा टोला लगावला.

यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ असून युवा स्वाभिमान पक्ष नेहमीच छोटा भाऊ म्हणून भाजपसोबत खंबीरपणे कार्यरत राहील, अशी भूमिका स्पष्ट केली. आपल्या राजकीय प्रवासामागे जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांनी सर्व समर्थकांचे आभारही मानले.

रवी राणा यांच्या या वक्तव्यानंतर बच्चू कडू आणि राणा यांच्यातील राजकीय कलगीतुरा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात या शाब्दिक संघर्षाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande