
सोलापूर, 27 जून (हिं.स.)। चार हुतात्मा चौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर केवळ इंग्रजी भाषेतील नामफलक लावण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करत सोलापूर महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी जलतरण तलाव परिसरात आंदोलन करत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असा मराठी नामफलक तातडीने लावण्याची मागणी केली. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेला प्राधान्य मिळाले पाहिजे, तसेच मराठी भाषेच्या संवर्धनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाचा उल्लेख इंग्रजीतच ठेवणे दुर्दैवी असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
प्रशासनाने ४८ तासांत मराठी नामफलक न लावल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शिवसेनेचे सत्तार सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, सुभाष माने, मनविसेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस संतोष घोडके, महिला आघाडी शहराध्यक्षा जयश्री हिरेमठ, सोनाली भागानगरे, सीमा जामगावकर, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, गोरक्ष उपरे, मयूर सोलनकर, वैभव रंपुरे, आदित्य मातोळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड