

रायगड, 27 जून (हिं.स.) : म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा अभाव, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरून शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. लवकरात लवकर रिक्त पदे भरून आवश्यक सुविधा उपलब्ध न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख अमित महामुणकर यांनी दिला आहे.
म्हसळा ग्रामीण रुग्णालय २०१४ मध्ये कार्यान्वित झाले असले तरी आजही अनेक मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या रुग्णालयात केवळ शहरातीलच नव्हे, तर तालुक्यातील सुमारे ८० वाड्या-वस्त्यांतील नागरिक उपचारासाठी येत असल्याने रुग्णांवर मोठा ताण आहे. मात्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी तसेच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्रीचा अभाव असल्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर तालुका प्रमुख अमित महामुणकर आणि माजी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी प्रभारी अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून रुग्णालयातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. रिक्त पदांची भरती, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्रीची उपलब्धता आणि रुग्णांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
महामुणकर यांनी सांगितले की, रुग्णालयात नुकतेच नियुक्त झालेले दोन शिकाऊ डॉक्टर मराठी भाषा समजत किंवा बोलत नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांशी संवाद साधताना अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा करण्यात आली असून परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन मिळाले आहे. मात्र, लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)