अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ४ टक्के क्षेत्रावर पेरणी
अमरावती, २७ जून (हिं.स.) : आर्द्रा नक्षत्रातील पहिल्या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील पावसाची तूट भरून निघाली असून खरीप पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे ४ टक्के क्ष
जिल्ह्यात चार टक्के क्षेत्रात पेरण्या कपाशीला सर्वाधिक पसंती तर सोयाबीनसाठी प्रतीक्षा


अमरावती, २७ जून (हिं.स.) : आर्द्रा नक्षत्रातील पहिल्या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील पावसाची तूट भरून निघाली असून खरीप पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे ४ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून त्यामध्ये कापूस पिकाखाली सर्वाधिक १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, २०२६-२७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ६ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असून त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, मॉन्सूनच्या विलंबामुळे मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या भागातील काही शेतकऱ्यांनीच पेरणी केली होती.

दरम्यान, २३ आणि २४ जून रोजी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून कोरडवाहू भागातही पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पेरण्यांचा वेग वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

कापूस आघाडीवर, सोयाबीनची पेरणी मंदावली

आतापर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये कापूस सर्वाधिक क्षेत्रावर असून १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. आवश्यक पाऊस न झाल्यामुळे सोयाबीनची पेरणी केवळ ३ हजार ९८४ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. तूर पेरणीला अद्याप सुरुवात झालेली नाही.

मूग व उडीदाची पेरणीही अत्यल्प झाली असून मूग ७.८ हेक्टर आणि उडीद ५.६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली असून १ हजार ५१४ हेक्टर क्षेत्रात मक्याची पेरणी पूर्ण झाली आहे.

पावसाने गाठली सरासरी

१ ते २५ जून या कालावधीत जिल्ह्यात ९१.४ मिमी पाऊस झाला असून तो गतवर्षीच्या याच कालावधीतील ८४ मिमी पावसापेक्षा अधिक आहे. धारणी, अमरावती, नांदगाव खंडेश्वर आणि अंजनगाव सुर्जी या तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागांमध्ये पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय चांदूर रेल्वे, दर्यापूर, धामणगाव रेल्वे आणि चिखलदरा तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांतील शेतकरी अद्याप पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande