
पुणे, 27 जून (हिं.स.) : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-2026 मध्ये ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन, तसेच फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, आज जग वेगाने बदलत असून एआयमुळे विविध क्षेत्रांत मोठे परिवर्तन घडत आहे. अशा काळात “तुम्ही काय करता” यापेक्षा “ते कसे करता” याला अधिक महत्त्व आहे. प्रत्येक कृतीत नैतिकता, करुणा आणि प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, नेतृत्व हे केवळ पदापुरते मर्यादित नसून प्रत्येक व्यक्ती आपल्या आचरणातून नेतृत्व करू शकतो. भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ ही संकल्पना म्हणजे मूल्यांची उन्नती आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात बोलताना पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी भारत-फ्रान्स सहकार्य, शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील वाढती भागीदारी अधोरेखित केली. 2026 हे ‘भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष’ म्हणून साजरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिम्बायोसिसचे संस्थापक प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानावर आधारित शिक्षण संस्थेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान नव्हे तर भारतीय मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीही आत्मसात करावी, असे त्यांनी सांगितले.
या समारंभातून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टीकोनासोबतच मानवतेची मूल्ये जपण्याचे आवाहन करण्यात आले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु